उरण : उरण तालुक्यातील आरोग्य विभागाची अतिशय दुर्दशा झाली आहे. अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यां अनास्थे मुळे उरण मधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटर आहे.आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर गेले आहे. कोप्रोली केंद्रात डॉक्टर आणि आरोग्य सेविका व इतर कर्मचारी अशी २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उरण ग्रामीण भागातील हजारो गर्भवती महिला, नवजात बालकांची तपासणी आणि इतर कामांचा भार अवघ्या तीन आरोग्य सेविकांवर आहे.
उरण तालुक्यातील दोन लाख लोकसंख्येसाठी येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार आहे. उरणच्या पूर्व भागातील सुमारे एक लाख गोरगरीब नागरिक उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. मात्र मागील आठवड्यात उद्भवलेली पाणदिव्यातील डेंग्यूची साथ आटोक्यात आल्यानंतर आता कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक उणिवा समोर आल्या आहेत.
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी ३, महिला आरोग्य परिचारिका २, आरोग्य सेविका २६, शिपाई २ आदी ३३ पदे मंजूर आहेत. यामध्ये आवश्यकता असलेल्या तीन सुरक्षारक्षकांचा समावेश नाही. मात्र यापैकी वैद्यकीय अधिकारी २, महिला आरोग्य परिचारिका १, आरोग्य सेविका २३, शिपाई २ अशी एकूण २७ पदे रिक्त आहेत.
रुग्ण तपासणीचा भार केवळ तीन आरोग्य सेविकांवर असल्यामुळे येथील आरोग्य सेवेचा परिणाम रुग्णावर होत आहे.रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे.रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे. वेळेत उपचार होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
शासना कडे रिक्त पदा बाबत यापूर्वी ही पाठपुरावा करण्यात आला आहे.मात्र कर्मचारी यांची भरती होत नाही.कोप्रोली आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यासाठी दरमहा होणाऱ्या प्रत्येक बैठकीत मागणी केली जाते.
- डॉ वंदन कुमार पाटील,उरण तालुका आरोग्य अधिकारी