बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणात अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीकडून अत्याचार झाल्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास संबंधित मुलगी गोठ्यातून घरी परतत असताना तिच्यावर चुलत चुलत्याने जबरदस्ती केल्याची घटना घडली. या घटनेनंतर ती मानसिक धक्क्यात गेली होती. त्यानंतर तिने विष प्राशन करून स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला घाटी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.