अंबरनाथ : अंबरनाथ शहरात एका तरुणीचा हॉटेलमधील रूममध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी एका नामांकित कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. तिचे कार्यालयातील वरिष्ठ व्यक्तीसोबत वैयक्तिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. काही काळापूर्वी दोघांमध्ये मतभेद होऊन संबंध संपल्याचे सांगितले जात आहे.
घटनेच्या दिवशी दोघे शेवटचा संवाद साधण्यासाठी अंबरनाथमधील एका हॉटेलमध्ये भेटले होते. मात्र, संबंधित व्यक्ती काही कारणास्तव तेथून निघून गेल्यानंतर तरुणी एकटीच रूममध्ये थांबली होती. बराच वेळ संपर्क न झाल्याने संशय निर्माण झाला. नंतर दरवाजा उघडून पाहिल्यावर तरुणी मृत अवस्थेत आढळून आली.
हॉटेल प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तीचीही चौकशी करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलिस तपासानंतरच घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.