मुंबई : भारतीय संगीतसृष्टीतील अजरामर नाव, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (१२ एप्रिल २०२६) वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी गायन कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या आशाताईंनी तब्बल आठ दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विविध भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गाऊन त्यांनी संगीतविश्वात अमिट ठसा उमटवला.त्यांच्या निधनानंतर सध्या सोशल मीडियावर त्यांच्या हस्ताक्षरातील एक भावनिक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात त्यांनी आपल्या चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पत्रात काय म्हटलं आहे?
या पत्रात आशाताईंनी रसिकांना उद्देशून म्हटलं आहे की, “मला इतकी वर्षं प्रेम देणाऱ्या सर्वांना मनापासून नमस्कार. तुमच्यामुळेच मी कलाकार म्हणून उभी राहू शकले. तुमचं प्रेम आणि साथ नसती, तर माझं आयुष्य अपूर्ण राहिलं असतं. ‘धन्यवाद’ हा शब्दही अपुरा आहे. मला असंच प्रेम देत रहा.”हे पत्र ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकात समाविष्ट असून, त्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांबद्दलची आपुलकी व्यक्त केली होती. या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते झाले होते. लेखिका मंजिरी हेटे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

शेवटची इच्छा देखील चर्चेत
दरम्यान, एका मुलाखतीत आशाताईंनी व्यक्त केलेली त्यांची शेवटची इच्छा देखील पुन्हा चर्चेत आली आहे. गाण्याशी अखंड नातं जपणाऱ्या आशाताईंनी “गात असतानाच आयुष्य संपावं” अशी इच्छा व्यक्त केली होती. संगीत हेच त्यांचं जीवन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वावर मोठी पोकळी निर्माण झाली असून, चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.