मुंबई: दादर परिसरात जुन्या वैमनस्यातून एका 40 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अंकुश आंबोरकर असे मृत व्यक्तीचे नाव असून, गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांनी त्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी दादरमध्ये आला होता. त्यावेळी गौरव सणसने त्याला अडवले आणि दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच सणसच्या टोळक्याने अंकुशवर हल्ला चढवला.
अंकुशची पत्नी प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. घटनेची माहिती मिळताच ती तातडीने घटनास्थळी धावली आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पतीला आरोपींच्या तावडीतून सोडवले. मात्र तोपर्यंत अंकुश गंभीर जखमी झाला होता.
पोलिसांनी त्याला तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बँजो व्यवसायातून सुरू झाला वाद
अंकुश आंबोरकर आणि गौरव सणस हे पूर्वी एकत्र बँजो वाजवण्याचा व्यवसाय करत होते. 2017 मध्ये दोघांनी वेगळे व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर सणसकडून सतत धमक्या आणि टोमणे दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही मारहाणीची तक्रार दाखल झाली होती.दरम्यान, जुन्या वादातून घडलेल्या या हत्येप्रकरणी पोलिस पुढील तपास करत असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.