अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (१९) याला अटक झाल्यानंतर तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
पोलिस तपासानुसार, आरोपी अयान हा शहरातील कठोरा नाका परिसरातील एका फ्लॅटमध्ये मुलींना नेऊन त्यांचे शोषण करत होता. याशिवाय, त्याने ‘द कॅफे रॉयल 10’ नावाच्या कॅफेचाही वापर केला असल्याची माहिती पुढे आली आहे. या कॅफेमध्ये स्वतंत्र कंपार्टमेंट्स उपलब्ध असून, तिथे जोडप्यांना बसण्यासाठी गोपनीय जागा दिली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी या जागेसाठी कॅफे चालकाला प्रतितास सुमारे ४०० रुपये देत होता.
या कॅफेवर यापूर्वीही पोलिसांनी अनेक वेळा छापे टाकले होते. तपासाच्या दरम्यान पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन चौकशी केली असून, कॅफे चालकाचीही विचारपूस करण्यात आली आहे. तसेच, कॅफेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन तपास यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. फॉरेन्सिक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला जात असून, आतापर्यंत सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. संपूर्ण अहवाल आल्यानंतरच अधिकृत माहिती समोर येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.