मुंबई : बिग बॉस मराठीचा सहावा सीझन अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ग्रँड फिनालेपूर्वी घरातील वातावरण अधिक रंगतदार करण्यासाठी मागील पर्वातील काही स्पर्धकांनी खास एन्ट्री घेतली. यामध्ये गायक अभिजीत सावंत याच्या आगमनाने घरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
अभिजीत सावंत हा मागील सिझनचा उपविजेता ठरला होता. त्याच्या शांत स्वभावासोबतच त्याच्या गायकीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यावेळी तो पुन्हा घरात दाखल होताच सदस्यांसोबत गप्पा मारत त्यांना मार्गदर्शनही करताना दिसला. मात्र त्याने दिलेला सर्वात मोठा सरप्राईज म्हणजे त्याची लाईव्ह परफॉर्मन्स.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीतने ‘तुम बिन’ चित्रपटातील एक लोकप्रिय गाणं सादर केलं. त्याच्या सुमधुर आवाजाने घरातील सर्व सदस्य अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. या अनपेक्षित सादरीकरणामुळे घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’चा अनुभव निर्माण झाला.
दरम्यान, बिग बॉस मराठी 6 च्या विजेतेपदासाठी तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद यांच्यात चुरस रंगली आहे. 19 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रँड फिनालेत कोण ट्रॉफी पटकावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रेक्षकांना हा भव्य सोहळा कलर्स मराठी वाहिनीवर तसेच जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.