नवी दिल्ली :काँग्रेसच्या सरचिटणी प्रियांका गांधी यांनी संसदेत भाजपवर जोरदार टीका करत महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. उन्नाव, हाथरस आणि मणिपूरसारख्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महिलांचे रक्षणकर्ते असल्याचा दावा संसदेत करणे सोपे आहे, पण प्रत्यक्षात तशी कामगिरी दिसली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडूंचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर संवेदनशीलतेचा अभाव असल्याचा आरोप केला. तसेच, अचानक बोलावण्यात आलेल्या अधिवेशनावरही त्यांनी शंका व्यक्त केली. “विधेयकाचा मसुदा कुणालाच माहित नव्हता, त्यामुळे यामागे राजकीय हेतू असल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे त्यांनी नमूद केले.
प्रियांका गांधी यांनी पुढे म्हटले की, महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. “हे महिलांसाठी नसून सत्तेची समीकरणे बदलण्यासाठीचे पाऊल होते,” असा आरोप त्यांनी केला.
इतिहासाचा संदर्भ देत त्यांनी इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात जागा ‘फ्रीज’ ठेवण्याचा निर्णय देशातील समतोल राखण्यासाठी घेतला गेला होता, असे सांगितले. “जर पुनर्रचनेमुळे दक्षिण भारत आणि लहान राज्यांचे प्रतिनिधित्व कमी झाले, तर देशात असंतुलन निर्माण होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.
या संपूर्ण प्रक्रियेमागे सत्तेत टिकून राहण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेचे समर्थन केले. “हा महिलांचा प्रश्न नसून राजकीय रणनीतीचा भाग होता,” असे त्या म्हणाल्या.