पुणे : अमृत 2.0 योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या वतीने नऱ्हेगाव परिसरात तब्बल 34 कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांच्या शुभहस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे नऱ्हे परिसरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून, भविष्यातील विकासासाठी भक्कम पायाभरणी झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून नऱ्हेगावातील महत्त्वाच्या मलवाहीनी प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कुटे मळा ते हिरा पन्ना स्वीट्स, वेताळ ते JSPM कॉलेज तसेच अभिनव परिसर ते नंदनवन सिटी या मार्गांवरील मलनिस्सारण कामांचा समावेश आहे.
नऱ्हे हा पुण्यातील झपाट्याने विकसित होणारा व लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर आहे. येथे अनेक शैक्षणिक संस्था असून, शहराच्या विविध भागांना जोडणारी महत्त्वाची कनेक्टिव्हिटी या भागातून उपलब्ध होते. त्यामुळे या परिसराचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने भविष्यात आणखी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचेही संकेत देण्यात आले असून, अमृत 2.0 च्या दुसऱ्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जाणार आहेत.
या प्रसंगी आमदार तापकीर यांनी सांगितले की, “नऱ्हे परिसराच्या विकासासाठी राज्य सरकार व महानगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. येत्या काळात नऱ्हेचा विकास अधिक वेगाने होईल.”
भूमिपूजन कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 34 मधील नगरसेवक जयश्रीताई भूमकर, कोमल नवले, राजाभाऊ लायगुडे, हरिभाऊ चरवड यांच्यासह माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, भाजप मंडळ अध्यक्ष यशवंत लायगुडे,सागर भूमकर, तसेच राजू कुटे, सारंग नवले, संतोष कुटे, शेखर वाल्हेकर, प्रदीप भूमकर, कैलाश वाल्हेकर, तेजस कुटे, संभाजी काकडे, प्रियांका पवार, बेबी सातपुते, लक्ष्मी अनगरकर, किरण वळसनकर आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या विकासकामांमुळे नऱ्हे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, परिसराच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळणार आहे.