मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले रंगतदार वातावरणात पार पडला आणि रत्नागिरीच्या मातीतून आलेल्या तन्वी कोलते हिने विजेतेपद पटकावत महाट्रॉफीवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत राकेश बापट उपविजेता ठरला. टॉप 5 मध्ये विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि अनुश्री माने यांचाही समावेश होता.
फिनालेपूर्वीच तन्वी विजेती होण्याची चर्चा रंगली होती आणि अखेर ती खरी ठरली. विजेतेपद जाहीर होताच तन्वीचा आनंद ओसंडून वाहू लागला. तिला महाट्रॉफीसोबतच 15 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. याशिवाय ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’कडून 10 लाखांचे व्हाउचर्स आणि ‘तुनवाल ई-मोटर्स’कडून ई-बाईकही भेट मिळाली.
मात्र, या सर्व बक्षिसांपेक्षा एक खास भेट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी तन्वीला छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक छायाचित्र फ्रेम करून भेट दिले. ही भेट पाहताच तन्वी भावूक झाली आणि तिने कृतज्ञतेने आभार मानले.
मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या तन्वीने संघर्षातून आपली ओळख निर्माण केली. रत्नागिरीहून मुंबईत येत तिने कोणत्याही गॉडफादरशिवाय अभिनय क्षेत्रात पाय रोवले. वैयक्तिक अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत तिने करिअर पुढे नेले. आज ‘बिग बॉस मराठी’च्या विजेतेपदाने तिच्या मेहनतीला यशाची मोठी पावती मिळाली आहे.