सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 जिल्हा

मध्य रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत; दिवा स्थानकात उसळली प्रचंड गर्दी

डिजिटल पुणे    21-04-2026 11:13:04

डोंबिवली : मध्य रेल्वेमार्गावरील सेवा सुरळीत होण्याआधीच पुन्हा एकदा विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी डोंबिवली स्थानकाजवळ लोकलच्या डब्याचा अपघात झाल्यानंतर मंगळवारीही त्याचे परिणाम कायम दिसून आले. दिवा स्थानकात सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये दिवा स्थानकातील दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. प्लॅटफॉर्मच्या टोकापर्यंत प्रवासी उभे असल्याचे स्पष्ट होत असून महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल गाड्या सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. सोमवारी झालेल्या अपघातानंतर रात्री खर्डी परिसरात तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक पहाटे संपणे अपेक्षित असताना तो सकाळी सहापर्यंत वाढल्याने रेल्वे सेवा आणखी उशिरा सुरू झाली.

दरम्यान, सोमवारी सकाळी डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडमधून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलचा पहिल्या वर्गाचा डबा रुळावरून घसरला होता. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती मोहीम राबवत सुमारे दोन ते अडीच तासांत डबा पुन्हा रुळावर आणला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.

गाड्यांच्या उशिरामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करावा लागत असून दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत. रेल्वे सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती