पुणे: पुण्यात लग्नासाठी प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने एका तरुणाने स्वतःला पोलीस दलात निवड झाल्याचा बनाव केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून एका तरुणाने थेट पोलीस अधिकारी असल्याचे भासवण्याचा धक्कादायक आणि तितकाच अजब प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर इम्प्रेशन मारण्यासाठी सुरू केलेला हा ‘फिल्मी प्लॅन’ अखेर पोलिसांच्या लक्षात येताच त्याची हवा निघाली.
नऱ्हे रोड परिसरात राहणारा ऋषिकेश राजू जाधव (वय 26) याने स्वतःची पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्याचा खोटा आभास निर्माण केला. यासाठी त्याने पोलीस वर्दीतील फोटो काढून तो व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केला. तसेच मित्रपरिवार आणि ओळखीच्या लोकांमध्ये आपण पोलीस दलात भरती झालो असल्याचे सांगत स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला.
या बनावाला अधिक विश्वासार्हता देण्यासाठी त्याने शहरातील काही ठिकाणी फ्लेक्सही लावले. त्या फ्लेक्सवर स्वतःचा पोलीस वर्दीतील फोटो आणि ‘पुणे शहर पोलीसमध्ये निवड’ झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यामुळे परिसरात काही काळ संभ्रम निर्माण झाला होता.
प्राथमिक चौकशीत समोर आले की, लग्न जमत नसल्यामुळे मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी आणि चांगले विवाह प्रस्ताव मिळावेत या उद्देशाने त्याने हा सगळा डाव आखला होता. ‘पोलीस अधिकारी’ असल्याचा आव आणून लग्नाची लाईन लागेल, असा त्याचा समज होता. मात्र, हा बनाव फार काळ टिकू शकला नाही.
दरम्यान, या प्रकाराची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचताच त्यांनी तपास सुरू केला. चौकशीत हा सर्व प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट झाले. सरकारी यंत्रणेची खोटी ओळख निर्माण करणे हा गंभीर गुन्हा असल्याने नऱ्हे पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावर खोटी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रकार किती गंभीर ठरू शकतात, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच नागरिकांनी अशा बनावट दाव्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.