सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 जिल्हा

14 मे रोजी पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल; डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह आरोपींच्या भवितव्यावर निर्णय

गजानन मेनकुदळे    22-04-2026 10:33:00

धाराशिव  : धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाला दोन दशकांपूर्वी हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. तब्बल २० वर्षांनंतर या खटल्यावर न्यायालय निर्णय देणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या या प्रकरणामुळे न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा आणि राजकीय घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

एकेकाळी धाराशिव जिल्हा येथील राजकारणावर वर्चस्व असलेले पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चुलत भाऊ, राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यातील राजकीय वाद हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्ष, राजकीय मतभेद आणि वाढती दरी यामुळे या दोन कुटुंबांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला होता.

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर निंबाळकर कुटुंबीयांनी थेट डॉ. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी डॉ. पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांना आरोपी करण्यात आले असून, खटल्याची सुनावणी मुंबई येथील विशेष न्यायालयात पार पडत आहे.

या हत्याकांडानंतर धाराशिव जिल्ह्याचे राजकारण पूर्णपणे बदलले. पवनराजे यांच्या निधनानंतर त्यांच्या नंतर राजकीय  जबाबदारी त्यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांनी स्वीकारली. त्यांनी राजकारणात प्रवेश करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि निंबाळकर घराण्याचा प्रभाव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, पाटील कुटुंबीयांनीही आपले राजकीय बळ कायम राखत या संघर्षात सक्रिय भूमिका बजावली.

दरम्यान, या खटल्याचा निकाल केवळ एका गुन्हेगारी प्रकरणापुरता मर्यादित नसून, त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरही उमटू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणार का, किंवा आरोपी निर्दोष सुटणार का, यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असू शकतात.

तसेच, या निकालामुळे दोन दशकांपासून सुरू असलेल्या निंबाळकर आणि पाटील कुटुंबीयांतील संघर्षाला पूर्णविराम मिळेल का, की नव्याने राजकीय वाद पेट घेतील, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यामुळे न्यायप्रक्रियेतील विलंब, साक्षीदारांची उलटफेर, पुराव्यांची पडताळणी आणि तपासातील गुंतागुंत यासारख्या अनेक मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.आता न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार असून, धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती