सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 जिल्हा

व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक

डिजिटल पुणे    24-04-2026 16:24:29

मुंबई : रिक्षा, टॅक्सी तसेच ई-बाईक टॅक्सी सेवांमधील व्यावसायिक वाहनचालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेशी निगडीत साहित्यिकांनी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, मराठी भाषा विभागाचे उपसचिव नामदेव भोसले, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे तसेच तज्ज्ञ, साहित्यिक उपस्थित होते.

वाहनचालकांना खेळीमेळीच्या वातावरणात व्यावहारिक मराठी शिकविण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या ७२ शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवित आहे. तसेच, मुंबई मराठी साहित्य संघाने आपल्या स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत संपूर्ण राज्यभर रिक्षा व टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान इतर नियमांसोबतच चालकांना मराठी भाषेचे व्यवहारज्ञान आहे की नाही, याचीही पडताळणी केली जाणार आहे. वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे चालकांना मराठी भाषेचे व्यवहारज्ञान मोहिमेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती