पुणे : मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग(कर्वेनगर, पुणे )येथे 'आयसीएसएफटी -२०२६' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन दि.२४ एप्रिल रोजी सकाळी करण्यात आले.' आयईईई पुणे सेक्शनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही परिषद ‘सस्टेनेबल अँड फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीज -२०२६’ या विषयावर आधारित असून शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकत्रीकरणावर विशेष भर दिला गेला आहे. देश-विदेशातील संशोधक, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या परिषदेत आहे.
या परिषदेचे उद्घाटन २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आयएमईआरटी सेमिनार हॉल, एमएमसीओई कॅम्पस, कर्वेनगर येथे झाले. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी उप अध्यक्ष डॉ. अभय जेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .डॉ.कार्ल डेबोनो (माल्टा )आणि प्रा.योहान्स कुर्नियावा (इंडोनेशिया), मराठवाडा मित्रमंडळ चे अध्यक्ष बी.जी.जाधव,आयईईई पुणे सेक्शनचे प्रमुख डॉ. अमर बुचडे,मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.सचिन साखरे,उपप्राचार्य स्वाती देशमुख, परिषदेच्या अध्यक्ष डॉ. कल्पना ठाकरे, निमंत्रक प्रा . संकीर्ती शिरवळे, प्रा.गिरिजा चिद्दरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. प्रा.मृणाल कोठारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गिरिजा चिद्दरवार यांनी आभार मानले.
परिषदेदरम्यान ३३१ संशोधन सादरीकरणे, चर्चासत्रे आणि तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रॉम्प्ट टू प्रॉडक्ट विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. अनेक परस्पर सहकार्य करार करण्यात आले.सस्टेनाबिलिटी सेल (एस डी जी)चे उद्घाटन करण्यात आले.यामुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना जागतिक स्तरावर आपले संशोधन मांडण्याची आणि नवीन तांत्रिक प्रवाह समजून घेण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात नवसंशोधनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त आली.
*नवे प्रश्न सोडविणारी शिक्षण पद्धती उत्क्रांत व्हावी : डॉ. अभय जेरे*
डॉ. अभय जेरे म्हणाले,' आधुनिक तंत्रज्ञानामुळे भोवतालची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. बँकिंग लागेल परंतू बँका लागतील का? भविष्यात शिक्षण लागेल परंतू शिक्षण संस्था लागतील का, असा प्रश्न पडतो आहे. तंत्रज्ञानाचे रूपांतर उत्पादनात केले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात नवी उत्क्रांती होत असून त्याला अनुरूप संस्कृती आणावी लागेल. अन्यथा आताच्या पिढीला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात अध्यापन पद्धती संपूर्ण बदलून जाईल. त्यामुळे शैक्षणिक अध्यापन पद्धतीला प्रत्यक्ष अनुभवांची जोड द्यावी लागेल. नव्या जगात निर्माण होणारे नवे प्रश्न शिक्षण संस्था सोडवू शकतील, अशा पद्धतीने उत्क्रांत झाल्या पाहिजेत. पूर्ण व्यावसायिक कारकीर्दीत दोन, तीन वेळा शिक्षण घ्यावे लागेल, ते अद्ययावत ठेवावे लागेल, अशी शक्यता आहे. नवे विद्यार्थी हाताळताना प्राध्यापक अधिक संवेदनशील असावे लागतील. अशा परिषदेतून यासंबंधी मंथन व्हावे.
डॉ. अमर बुचडे म्हणाले, 'उद्योग आणि शिक्षण क्षेत्राला एकत्र आणण्याचे चांगले प्रयत्न या परिषदेमुळे झाले.आयईईई पुणे सेक्शनचे सहकार्य अशा परिषदांना आणि संशोधनाला राहील'.'शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात सतत होणारे बदल पाहून आगामी आव्हाने स्वीकारली पाहिजेत, असे मनोगत बी. जी. जाधव यांनी व्यक्त केले.