मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ सध्या जोरदार चर्चेत आहे. तब्बल 100 कोटींच्या बजेटसह तयार झालेला हा भव्य सिनेमा 1 मे 2026 रोजी देशभर प्रदर्शित होणार असून, ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असून, जेनेलिया देशमुख सईबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे.
या चित्रपटात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग आहे. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते यांच्यासह अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, सलमान खान अशी मोठी स्टारकास्ट यात पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, आता ‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरात ओळख निर्माण करणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी नुकताच रितेश देशमुखसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भूमिकेची माहिती दिली.
सुरेश विश्वकर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “1 मेपासून प्रदर्शित होणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटात मी चंद्रराव मोरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेश देशमुखसारख्या नम्र आणि गुणी कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला.”
चित्रपटात जावळीच्या खोऱ्यातील संघर्ष आणि स्वराज्यातील महत्त्वाच्या घटनांचा थरारक प्रवास दाखवण्यात येणार आहे, ज्यात चंद्रराव मोरे यांची भूमिका विशेष ठरणार आहे.
सुरेश विश्वकर्मा यांची कारकीर्द:
सुरेश विश्वकर्मा यांनी ‘सैराट’मध्ये आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर ‘मुळशी पॅटर्न’, ‘रेगे’, ‘महिमा खंडोबाचा’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांसोबतच नाटक, मालिका आणि वेब सिरीजमधील त्यांच्या अभिनयाचेही मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले आहे.