मुंबई : रितेश देशमुख अभिनीत व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या विक्रमी कमाईमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत चर्चांना उधाण आलं आहे.
या यशानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देत चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये निर्माती जेनेलिया डिसूजा यांचं अभिनंदन करत, “चित्रपट ज्या पद्धतीने विक्रम मोडतोय, ते पाहून असं वाटतंय जणू छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्मच झाला आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
‘राजा शिवाजी’ची निर्मिती जेनेलिया डिसूझा यांनी केली असून सहनिर्मिती ज्योती देशपांडे यांची आहे. चित्रपटात संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, भाग्यश्री पटवर्धन आणि फरदीन खान यांच्यासह अनेक नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे सलमान खान यांचा कॅमिओही प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे ₹11.35 कोटींची कमाई करत मराठी चित्रपटांसाठी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यापैकी जवळपास ₹8 कोटींची कमाई मराठी आवृत्तीतून झाली असून, 1,900 हून अधिक शोमध्ये सुमारे 68 टक्के ऑक्युपन्सी नोंदवली गेली आहे.मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ने पहिल्याच दिवशी मिळवलेलं यश पाहता, पुढील काही दिवसांत हा चित्रपट आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी चर्चा सुरू आहे.