पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर आज सकाळीही नसरापूरमधील सुपर बाजार चौकात ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन पुन्हा सुरू केले. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचे सांगितले. आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्याची विनंती हायकोर्टाला केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला घटनेनंतर अल्पावधीतच अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून सध्या पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. आरोपीने मुलीला कशा प्रकारे फूस लावली, याचा तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून, पीडित कुटुंबासाठी सर्वत्र सहानुभूती व्यक्त केली जात आहे.