लोणावळा : लोणावळा घाटातील मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे मोठ्या गाजावाजात उद्घाटन झाले असले, तरी प्रत्यक्षात हा मार्ग सध्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. मुंबईहून पुण्याकडे जाणारी लेन सुरू करण्यात आली असली, तरी पुण्याहून मुंबईकडे येणारी मार्गिका अद्याप बंदच आहे.
खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान उभारलेल्या या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास जलद आणि सुरक्षित होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र सध्या पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांना जुन्याच घाटमार्गाचा वापर करावा लागत आहे, त्यामुळे काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई मार्गिकेवरील काही कामे अद्याप अपूर्ण आहेत. उद्घाटनावेळी उभारलेले स्टेज व पेंडॉल हटवण्याचे कामही सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच ही लेन सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, उद्घाटनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र आजपासून मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू आहे. MSRDC कडून आजच मार्गिका सुरू करण्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.