पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये “फास्टट्रॅक” कारवाईची घोषणा केली जाते, मात्र त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होते याबाबत सरकारने स्पष्टता दाखवावी, असेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत कायद्याचा धाक कमी होत असल्याचे सांगितले. तसेच, अशा घटनांनंतर आंदोलकांवर कारवाई होत असल्याच्या बातम्यांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
समाजातील बदलत्या प्रवृत्तींकडे लक्ष वेधताना त्यांनी सत्ता, पैसा आणि डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव यामुळे सामाजिक मूल्यव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे म्हटले. “जे वरती घडतं त्याचं प्रतिबिंब समाजात उमटतं,” असे सांगत त्यांनी सर्व स्तरांवर मूलभूत बदलांची गरज अधोरेखित केली.या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करत त्यांनी समाज, माध्यमे आणि राजकारण्यांनीही जबाबदारीने भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.