मुंबई : राजा शिवाजी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक सिनेमाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळवली असून कमाईतही सातत्य राखले आहे. पहिल्या वीकेंडला जोरदार गल्ला जमवल्यानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाही चित्रपटाने चांगली कमाई कायम ठेवली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाने पाच दिवसांत सुमारे 47.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवारी 12.40 कोटी, शनिवारी 11.50 कोटी आणि रविवारी तब्बल 13.10 कोटींचा गल्ला जमवत चित्रपटाने विकेंडमध्ये आघाडी घेतली. सोमवारी कमाईत घट होत 5.60 कोटींची नोंद झाली, तर मंगळवारी 4.90 कोटींची भर पडली. या जोरावर चित्रपट 50 कोटींच्या क्लबच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले असून त्यांनी अभिनेता, निर्माता आणि लेखक म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. शिवचरित्रावर आधारित हा सिनेमा केवळ ऐतिहासिक घटनांपुरता मर्यादित न राहता शौर्य, नेतृत्व आणि स्वाभिमानाचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारखी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळते.
भव्य सेट्स, प्रभावी तांत्रिक मांडणी आणि दमदार अभिनयामुळे ‘राजा शिवाजी’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून पुढील काही दिवसांत 50 कोटींचा टप्पा सहज पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.