पुणे : सिंहगड किल्ला येथे फोटो काढताना एका पर्यटकाचा पाय घसरून सुमारे 150 ते 170 फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र प्रसंगावधान राखत आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधल्यामुळे त्याचा जीव वाचला असून बचाव पथकाने अंधारात धाडसी मोहीम राबवत त्याला सुरक्षित बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश मोहन शितोळे (वय 35, रा. शिरूर) हे मंगळवारी सिंहगडावर फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास ते किल्ल्याच्या पश्चिमेकडील ‘हवा पॉईंट’ परिसरात सूर्यास्ताचे फोटो टिपण्यासाठी गेले होते. यावेळी गवतावरून पाय घसरल्याने ते थेट खोल दरीत पडले. अपघातानंतर काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली.
सुमारे दोन तासांनी शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून आपली अडचण कळवली. माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्याचे कर्मचारी अनिकेत काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला कळवले.
यानंतर पोलिस आणि रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अंधार आणि कठीण भूप्रदेश असूनही पथकाने सुमारे 150 ते 170 फूट खोल दरीत उतरून शितोळे यांना सुरक्षित वर आणले. त्यानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर उपचार सुरू आहेत.
या धाडसी बचाव मोहिमेत तानाजी भोसले, संतोष भगत, गणेश सपकाळ, संजय चोरघे, नाना जरंडे, कृष्णा मरगळे, उत्तम पिसाळ, वैभव भोसले, पोलिस कर्मचारी अनिकेत काळे आणि प्रवीण तेलवाडे यांनी सहभाग घेतला.