मुंबई: उद्योग व समाजाच्या प्रगतीसाठी क्वांटम संगणन तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करण्याची आवश्यकता असून, विविध क्षेत्रांनी त्यासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे, असे मत आयबीएमचे संचालक अमित सिंघी यांनी व्यक्त केले. ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत मंत्रालयात आयोजित केलेल्या सत्रात ते बोलत होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, महाआयटी विभागाचे सचिव विरेंद्र सिंह तसेच राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे उपस्थित होते.
क्वांटम संगणनाचा वापर एरोस्पेस, वाहन उद्योग, रसायन, ऊर्जा, वित्तीय सेवा, आरोग्य आणि जीवनशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये होऊ शकतो. गुंतागुंतीच्या गणितीय व रासायनिक समस्यांचे निराकरण, प्रक्रिया अनुकूलन आणि कार्यक्षमता वाढविणे यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. सध्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून या क्षेत्रात संशोधन व विकासाचे कार्य सुरू असून, औद्योगिक समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न होत आहेत.
लॉजिस्टिक्स क्षेत्रात वितरण व्यवस्थापन, वाहन मार्ग नियोजन आणि पुरवठा साखळीचे अनुकूलन यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. वित्तीय क्षेत्रात गुंतवणूक व्यवस्थापन, अचूक विश्लेषण अधिक ठकळपणे करण्यास मदत होत आहे. तसेच, ऊर्जा व रसायन क्षेत्रात बॅटरी तंत्रज्ञान , खत निर्मिती प्रक्रियेत कार्यक्षमता वाढविण्यासाठी, तर आरोग्य क्षेत्रात प्रथिनांच्या संरचनेचा अभ्यास करून औषधनिर्मिती प्रक्रियेला गती देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, असेही सिंघी यांनी यावेळी सांगितले.
भारत सरकारकडून ‘राष्ट्रीय क्वांटम अभियान’ अंतर्गत या क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक धोरणात्मक पावले उचलण्यात येत असून, संशोधन संस्था, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात समन्वय साधण्यावर भर देण्यात येत आहे. राज्य स्तरावरही या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.क्वांटम संगणनामुळे सायबर सुरक्षेसमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता असून, विद्यमान एन्क्रिप्शन प्रणालींमध्ये आवश्यक त्या आधुनिक सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे अधिक सक्षम सुरक्षा प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सिंघी यांनी सांगितले.सत्रादरम्यान सिंघी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.