पुणे : नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर नवले पूल परिसरात निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीची पुणे पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवले पूल परिसरात कोणत्याही प्रकारची आंदोलने, निदर्शने किंवा रास्ता रोको करण्यास बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल हा पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक दुवा मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो खासगी वाहने, मालवाहतूक, सार्वजनिक परिवहन आणि आपत्कालीन सेवा वाहने प्रवास करत असतात. त्यामुळे या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नसरापूर घटनेनंतर झालेल्या आंदोलनादरम्यान अचानक रस्ता रोखण्यात आल्याने काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शालेय विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. काही रुग्णवाहिकाही वाहतुकीत अडकल्याने आपत्कालीन वैद्यकीय सेवांवर परिणाम झाल्याची गंभीर बाब समोर आली होती.
या घटनेनंतर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी नवले पूल परिसरात आंदोलनांवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाच्या नावाखाली महामार्ग किंवा मुख्य रस्ते रोखून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार यापुढे सहन केला जाणार नसल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पोलीस प्रशासनाने या भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले असून, वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करणे, प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर महिला व बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या ३७ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित आरोपींच्या हालचाली आणि वर्तणुकीवर स्थानिक पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.