जालना : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक आणि सुपाऱ्या फेकून निषेध व्यक्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शहरातील विशाल कॉर्नर परिसरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, ज्या वाहनावर हल्ला झाला त्या गाडीत सदावर्ते यांच्या पत्नी आणि मुलगी उपस्थित होत्या.
माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी हा निषेध आंदोलनाच्या स्वरूपात केल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील रिक्षाचालक आणि मराठी-अमराठी वादाच्या मुद्द्यावरून सदावर्ते यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मनसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणात मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर चंदनझिरा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.