पुणे : “माझा प्रभाग – स्वच्छ प्रभाग” या संकल्पनेतून पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३४ मध्ये दर रविवारी नियमित स्वच्छता अभियान राबविण्याची आज उत्साहात सुरुवात करण्यात आली. या अभियानात स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, स्थानिक नगरसेवक, विविध सहकारी संस्था, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, मुकादम, स्वच्छता कर्मचारी आणि वाहनचालक यांच्या संयुक्त सहभागातून ही मोहीम राबविण्यात आली.
अभियानाची सुरुवात श्री कंट्रोल चौक ते विजयनगर परिसरात करण्यात आली. या भागात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील कचरा, स्वच्छतेच्या समस्या, कचरा विलगीकरण, घंटागाडी व्यवस्था आणि नागरिकांच्या अडचणींबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच नागरिकांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेसाठी जवळपास १० टेम्पो गाड्या, विविध यंत्रसामग्री तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.“स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” हा संदेश या अभियानातून देण्यात आला.
यापुढे दर रविवारी प्रभागातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून नागरिक, गृहनिर्माण संस्था, युवक मंडळे, सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, पुढील रविवारी राजयोग परिसरात होणाऱ्या स्वच्छता अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंती नगरसेवक श्री. हरिदास चरवड यांनी केली आहे.