पुणे : ‘स्वच्छ पुणे संकल्प २०२६’ अभियानांतर्गत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३४ मधील नऱ्हे-धायरी परिसरात रविवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागरिक, व्यापारी, युवक मंडळे तसेच स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान रस्ते साफसफाई, कचरा उचलणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि राडारोडा हटविण्याचे काम करण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेत सुमारे १२ टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी स्वच्छता मोहीम महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नगरसेवक हरिदास चरवड, महापालिका सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर रविवारी प्रभागातील विविध ठिकाणी अशी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.