पुणे : पुण्यातील आपटे रस्ता परिसरातील एका हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशोक मिलापचंद जैन (वय ६१) असे मृत उद्योजकाचे नाव असून, त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. ते सॅलिसबरी पार्क परिसरात वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक जैन घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेट पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास आपटे रस्त्यावरील हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा उघडला असता अशोक जैन मृतावस्थेत आढळले. खोलीत विविध ठिकाणी उलटी झाल्याचे दिसून आले असून, त्यांनी विषप्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली असून ती जैन यांनी लिहिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत असून, तपासानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.