पुणे : राज्यात पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सखाराम सानप यांच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात मोठी वाढ होणार असून अनेक ठिकाणी पारा नव्या उच्चांकी स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अकोला आणि नंदुरबार येथे तापमान 45 अंशांहून अधिक नोंदवले गेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र जाणवणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांत अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र आता पावसाची शक्यता कमी असल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असून रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.