मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील गाजलेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा पुढचा भाग ‘देऊळ बंद 2’ सध्या चर्चेत आहे. नुकताच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांच्या साक्षीनं लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकारांसह दिग्दर्शक व निर्माते उपस्थित होते.
पहिल्या भागात गश्मीर महाजनी याने राघव शास्त्री ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘देऊळ बंद 2’मध्येही तीच कथा पुढे जाईल, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. मात्र यावेळी कथा पूर्णपणे बदलण्यात आली असून मुख्य भूमिकाही बदलली आहे.या चित्रपटात यावेळी स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ती एका शेतकरी महिलेची व्यथा मांडणारी भूमिका साकारत आहे.
कथा आणि भूमिकेतील बदलाबाबत प्रवीण तरडेंचं स्पष्टीकरण
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या बदलामागचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की, या भागात कथा पुरुषप्रधान दृष्टिकोनातून पुढे न नेता स्त्रीकेंद्री करण्यात आली आहे.ते म्हणाले की, पुरुष बाहेर कितीही कणखर दिसत असला तरी त्याच्या मागे एक सक्षम स्त्री असते, जी संसाराला स्थिर ठेवते. अनेकदा अशा स्त्रियांच्या त्यागाकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे या भागात त्या भावनेला केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे.
स्नेहल तरडेंबद्दल खास उल्लेख
प्रवीण तरडेंनी स्नेहल यांच्या योगदानाबद्दलही भावनिक वक्तव्य केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, संघर्षाच्या काळात घराची जबाबदारी त्यांनी सांभाळली, आर्थिक आधार दिला आणि कठीण काळात साथ दिली.त्यांनी पुढे सांगितलं की, ‘धर्मवीर’मधील त्यांच्या भूमिकेनंतर स्नेहल यांच्या अभिनयाची दखल घेतली गेली आणि आता ‘देऊळ बंद 2’मध्ये त्यांना प्रमुख भूमिका देण्यात आली आहे.
प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात असलेली कथा पुढे कशी जाईल याबाबतची उत्सुकता आता पूर्णपणे वेगळ्या वळणावर गेली आहे. ‘देऊळ बंद 2’मध्ये स्त्रीप्रधान कथा कशी मांडली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.