मुंबई : पुण्यातील महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधानभवनात आढावा घेण्यात आला. पुनर्वसनाची प्रक्रिया राबविताना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेण्यात यावे, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समिती, पुणे यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष व ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत रहिवाशांच्या पुनर्वसन, मोबदला, फ्लॅट वाटप आणि सर्वेक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इतर महानगरपालिकांमध्ये देण्यात आलेल्या मोबदल्याचा अभ्यास करण्यात यावा, असे निर्देश दिले. महानगरपालिका किती जागा सामावून घेऊ शकते याचाही अभ्यास करण्यात यावा. ज्या महानगरपालिकांमध्ये जितका मोबदला देण्यात आला आहे त्याचाही अभ्यास करण्यात येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना १५ तारखेला विशेष बैठक घेण्यात यावी, अशा सूचना दिल्या. संबंधित रहिवाशांसमोर धोरण मांडण्यात यावे, त्यांना आवाहन करण्यात यावे आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकता आणि लोकाभिमुख भूमिका महत्त्वाची असून ज्यांना रोख रक्कम हवी आहे त्यांना रोख मोबदला आणि ज्यांना फ्लॅट हवा आहे त्यांना फ्लॅट देण्याचा पर्याय विचारात घेण्यात यावा. सर्व स्मारकांचे सर्वेक्षण करून संपूर्ण तपशील लोकांसमोर मांडण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
कृती समितीच्या सदस्यांना स्थायी समिती सदस्यांकडे निवेदन सादर करून आपले मत अधिकृतपणे नोंदविण्याचाही सल्ला डॉ. गोऱ्हे यांनी दिला. त्यामुळे किती लोक घर स्वीकारण्यास तयार आहेत आणि किती लोकांना रोख रक्कम हवी आहे याची स्पष्ट माहिती उपलब्ध होईल. बैठकीपूर्वी लोकांचे मत जाणून घेतले तर ते उपयोगी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त सपकाळ यांनी सर्व संबंधितांची स्वतंत्र बैठक घेऊन वन-टू-वन संवाद साधण्यात यावा. त्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी, असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
तसेच महात्मा फुले स्मारक रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीस पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, उपायुक्त सपकाळ, नगर विकास विभाग २ च्या उपसचिव प्रियंका छापवाले, महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे, समितीचे सदस्य विशाल मोहिते, अमर नाईक, अविनाश देवकुळे, श्रीनिवास गोणे, नरेंद्र कच्चावे यांच्यासह इतर सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.