सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
  • युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
  • मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
  • पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
 जिल्हा

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

डिजिटल पुणे    12-05-2026 16:30:07

रायगड-अलिबाग : रोहा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.डॉ. सी. डी. देशमुख सभागृह, रोहा येथे आयोजित कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री  आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, रोहा-अष्टमी नगर परिषद नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलुस्कर, मुरुड नगराध्यक्षा दांडेकर, मुख्याधिकारी अजयकुमार एडके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, विकास म्हणजे केवळ सिमेंटच्या इमारती अथवा रस्ते नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे होय. श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण, पर्यटन आणि रोजगार यांचा समतोल राखून विकास साधण्यास शासन प्राधान्य देत आहे. कोकणातील नागरिक मेहनती, प्रामाणिक व कष्टाळू असून कोकणाचा विकास हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी सांगितले.

रायगड ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची पावन भूमी असून सामाजिक समतेचा इतिहास घडविणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहाचीही ही भूमी आहे. कोकण हा निसर्गसंपन्न, सांस्कृतिक वैभव लाभलेला प्रदेश असून येथील विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

रोहा-अष्टमी नगर परिषद हद्दीतील कुंडलिका नदीकाठावर विविध ठिकाणी पुरसंरक्षक भिंती बांधणे, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे खाऊ गल्ली विकसित करणे, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांनी तयार केलेले शिवसृष्टी शिल्प उभारणे, धावीर महाराज मंदिर येथे भक्तनिवास नूतनीकरण करणे तसेच स्वर्गीय दत्ताजीराव ग. तटकरे ब्लड बँक विकसित करणे आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मनोगतात स्व. अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना, दर्जेदार विकासकामे करण्यावर त्यांचा नेहमी भर होता, असे सांगितले. कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील सुमारे 12.30 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आज होत असल्याचे त्यांनी नमूद केले. रायगड व कोकणाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार सुनील तटकरे यांनी स्व. अजित पवार यांच्या विकासदृष्टीचा उल्लेख करताना, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विकासाला गती देण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले.कार्यक्रमास नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती