नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणारी NEET 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. 3 मे 2026 रोजी देशभरात पार पडलेल्या या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप समोर आल्यानंतर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा (NTA) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असून नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.
यंदा देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, परीक्षेच्या तब्बल 42 तास आधीच प्रश्नपत्रिका WhatsApp आणि इतर माध्यमांतून फिरत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यानंतर पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजू लागला होता.
नव्या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती
NTA कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. 3 मे रोजी देण्यात आलेली परीक्षा केंद्रे कायम राहणार असून नव्या परीक्षेसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, उमेदवारांना नवीन प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
CBI चौकशीचे आदेश
पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी CBI तपासाचे आदेश दिले आहेत. विविध राज्यांमधील संशयित नेटवर्क, दलाल आणि पेपर विक्री रॅकेटचा तपास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
लोकसभा विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी NEET पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “NEET ही आता परीक्षा राहिलेली नाही, तर ती लिलाव प्रक्रिया बनली आहे,” असा आरोप त्यांनी केला. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा दावा करत त्यांनी गेल्या काही वर्षांत झालेल्या पेपरफुटीच्या घटनांचाही उल्लेख केला.
रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते Rohit Pawar यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “Guess Paper मधील अनेक प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आल्याने पैशांचा मोठा खेळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे म्हणत त्यांनी तपास यंत्रणांकडून कठोर कारवाईची मागणी केली.