सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
  • पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
 राज्य

भारताकडे किती दिवसांचा इंधनसाठा? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिली मोठी माहिती

डिजिटल पुणे    13-05-2026 12:36:53

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधनसाठ्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री  हरदीप सिंग पुरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. भारताकडे सध्या 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा, 60 दिवसांचा नैसर्गिक वायू (LNG) आणि 45 दिवसांचा एलपीजीचा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत आयोजित सीआयआयच्या वार्षिक परिषदेत बोलताना पुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाचा उल्लेख केला. “पंतप्रधानांनी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावू नका. इंधन आणि संसाधनांचा वापर शक्य तितका कमी करणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.

तेल कंपन्यांना मोठा आर्थिक फटका

पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी 64-65 डॉलर प्रति बॅरल असलेले तेल आता 115 डॉलरपर्यंत पोहोचल्याचे पुरी यांनी सांगितले. या परिस्थितीमुळे सरकारी तेल कंपन्यांना दररोज सुमारे 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असून एकूण तोटा 1.98 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

एलपीजी उत्पादनात मोठी वाढ

होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारताच्या मोठ्या प्रमाणातील तेल आणि गॅस आयातीवर परिणाम झाल्यानंतर केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. याअंतर्गत एलपीजी उत्पादन दररोज 36 हजार मेट्रिक टनांवरून 54 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती पुरी यांनी दिली. त्यांनी याला “महत्त्वपूर्ण यश” असे संबोधले.

देशातील सामरिक साठ्याची स्थिती

विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पाडूर येथील भूमिगत साठवण प्रकल्पांमध्ये एकूण 5.33 दशलक्ष मेट्रिक टन कच्चे तेल साठवण्याची क्षमता आहे. सध्या या सुविधांमध्ये सुमारे 3.37 दशलक्ष मेट्रिक टन साठा उपलब्ध असून तो जवळपास 9 ते 10 दिवसांची गरज भागवू शकतो. तेल कंपन्यांच्या साठ्यासह एकत्रित विचार केल्यास देशाकडे सध्या 60 दिवसांचा कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू तसेच 45 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय निकष काय सांगतात?

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) मानकांनुसार कोणत्याही देशाकडे किमान 90 दिवसांच्या आयातीइतका इंधनसाठा असणे अपेक्षित असते. भारत अद्याप त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला नसला तरी सध्याचा 60 ते 74 दिवसांचा राखीव साठा सुरक्षित मानला जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


 Give Feedback



 जाहिराती