पुणे : देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता पुणे कनेक्शन समोर आले असून पुणे गुन्हे शाखेने एका 46 वर्षीय महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही महिला बिबवेवाडी परिसरात ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव असून तिने विद्यार्थ्यांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचविण्यात मध्यस्थी केल्याचा संशय आहे. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याला मदत केल्याचाही आरोप तिच्यावर आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी तिचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला असून काही व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेजेसच्या आधारे दोघांमधील संपर्क असल्याचे संकेत मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुणे पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही महिला आणि धनंजय लोखंडे हे काही विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचाही संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नाशिकमधील संशयित शुभम खैरनार याला सीबीआयने ताब्यात घेतले असून त्याला मुंबईकडे नेण्यात आले आहे. या कारवाईनंतर तपास यंत्रणांनी महाराष्ट्रासह हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणातही तपास सुरू केला आहे.या संपूर्ण प्रकरणात NEET पेपर लीक 10 ते 15 लाख रुपयांत विक्री झाल्याचा गंभीर आरोप असून सीबीआय तपासाला वेग आला आहे.