पुणे : काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील ससाणेनगर, हडपसर येथे झालेल्या खूनप्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत पोलिसांनी मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक केली आहे. आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मे २०२६ रोजी हिंगणे बिल्डिंग पार्किंग, गल्ली क्रमांक ५, ससाणेनगर, हडपसर येथे गणेश संजु बिरादार (वय २५) यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी दुर्वांग उर्फ पारस सुनिल मानकर आणि साहील शेलार यांनी गणेश बिरादार यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचा खून केला.या प्रकरणी पुणे शहर पोलीस अंतर्गत काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०१/२०२६ अन्वये भा.न्या.स. कलम १०३, १०९ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान मुख्य आरोपी दुर्वांग उर्फ पारस मानकर हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी साहील सागर शेलार (वय २४), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०) आणि सुरज रमेश दोरकर (वय २१) यांना ताब्यात घेत अटक केली.
यानंतर पुढील तपासात मुख्य आरोपी दुर्वांग उर्फ पारस सुनिल मानकर (वय २१), पारस किशोर गायकवाड (वय २१) आणि अभि उर्फ अभिजीत संजय इंगळे (वय २२) हे खेडशिवापूर ते कात्रज परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी तिघांनाही शिताफीने अटक केली.या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे तसेच काळेपडळ पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.