सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
  • पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
 शहर

काळेवाडीत थरारक घटना : 65 वर्षीय महिलेचा पाय उघड्या व्हॉल्वमध्ये अडकला, दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुटका

डिजिटल पुणे    13-05-2026 17:51:12

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यालगत असलेल्या उघड्या व्हॉल्वमध्ये 65 वर्षीय महिलेचा पाय अडकून पडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न करत महिलेची सुखरूप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्मिता भागवत कासारे या दुपारी काळेवाडी परिसरातून पायी जात असताना जमिनीच्या समांतर असलेला उघडा फायबर व्हॉल्व त्यांच्या नजरेस पडला नाही. चालत असताना त्यांचा पाय थेट व्हॉल्वमध्ये घसरला आणि गुडघ्यापर्यंत अडकला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र पाय बाहेर निघत नसल्याने तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी परिस्थितीची पाहणी करत बचावकार्य सुरू केले. महिलेच्या पायाला इजा होणार नाही, याची विशेष काळजी घेत जवानांनी व्हॉल्वच्या बाजूने खोदकाम केले.

सुमारे चार ते पाच फूट खोलीपर्यंत खड्डा खणून संबंधित पाईप बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पाईप कापून महिलेचा पाय सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आला. जवळपास दोन तास चाललेल्या या बचाव मोहिमेनंतर महिलेची सुखरूप सुटका होताच उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या घटनेमुळे शहरातील उघडे आणि असुरक्षित व्हॉल्वचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा ठिकाणी मजबूत झाकणं बसवणे, सूचना फलक लावणे आणि नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती