पुणे : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, अधीक्षक अभियंता विपिन शिंदे, पीएमपीएमएलचे संचालक व नगरसेवक अजय खेडेकर, निलेश गिमे, प्रशांत डोके यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सावे म्हणाले की, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. सध्या पुणे महापालिकेमार्फत सुमारे १० टक्के काम पूर्ण झाले आहे.
स्मारकाची वैशिष्ट्ये
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ऑडिओ-व्हिडिओ शो
दोन्ही महापुरुषांचे कार्य आणि विचारांची माहिती
मुली व महिलांसाठी कौशल्य विकास, मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र
स्मारक परिसरात अॅम्फी थिएटरची सुविधा
महापालिकेकडून स्मारक विकास आराखड्यानुसार कामे करण्यात येत असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.