उत्तर प्रदेश : उत्तर भारतात सध्या हवामानाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळत आहे. एका बाजूला उत्तर प्रदेशात भीषण वादळ आणि पावसाने हाहाकार माजवला असून, दुसऱ्या बाजूला राजस्थान आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत आहे. बुधवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज, अयोध्यासह तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये आलेल्या वादळामुळे 94 जणांचा मृत्यू झाला. प्रयागराजमध्ये सर्वाधिक 17, तर भदोहीमध्ये 16 जणांचा बळी गेला आहे.
बरेली जिल्ह्यात ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याने एक तरुण पत्र्याच्या शेडसकट हवेत उडाल्याची धक्कादायक घटना घडली. अनेक ठिकाणी झाडे, वीज खांब आणि घरांचे नुकसान झाले. हवामान खात्याने आजही राज्यातील 51 जिल्ह्यांसाठी जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
भदोहीत झाड कोसळून महिला आणि दोन मुलींचा मृत्यू
भदोही जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर होती. सायंकाळी अचानक हवामान बदलले आणि जोरदार वाऱ्यांसह वादळ सुरू झाले. सुरियावान परिसरातील खरगसेनपट्टी गावात एका घरावर झाड कोसळल्याने महिला आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. औराई भागातही झाडाखाली उभ्या असलेल्या काही नागरिकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमध्ये 8 जण जखमी झाले असून 16 जनावरेही दगावली आहेत.
राजस्थानात उष्णतेचा कहर; जैसलमेर सर्वाधिक तापले
राजस्थानमध्ये सलग चौथ्या दिवशी जैसलमेर देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. येथे तापमान 46.1 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. हवामान विभागाने बिकानेर, जोधपूर, जैसलमेर आणि बारमेरमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील 25 हून अधिक जिल्ह्यांत हीटवेव्ह
मध्य प्रदेशातही उष्णतेने कहर केला असून 25 हून अधिक जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हची परिस्थिती निर्माण झाली आहे. खजुराहो येथे बुधवारी तापमान 45.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. इंदूर, उज्जैन, धार आणि रतलाममध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, रात्रीच्या तापमानातही वाढ होण्याचा अंदाज आहे.
हरियाणा, बिहार आणि उत्तराखंडलाही अलर्ट
हरियाणातील नारनौल येथे तापमान 42.5 अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून 17 मेपासून राज्यात हीटवेव्हचा यलो अलर्ट लागू होणार आहे. बिहारमधील पूर्णिया आणि कटिहारसह सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तराखंडच्या डोंगराळ भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.