सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 विश्लेषण

डॉ. गोऱ्हे यांची सलग पाचव्यांदा विधानपरिषदेवर बिनविरोध निवड;महिलांच्या सक्षमीकरण व सुरक्षेला देणार प्राधान्य - आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

डिजिटल पुणे    14-05-2026 16:50:16

मुंबई : विधानपरिषद सदस्य म्हणून पाचव्यांदा शपथ घेताना जबाबदारी अधिक वाढल्याची भावना व्यक्त करत महिलांच्या सक्षमीकरण व सुरक्षिततेसाठी कठोर कायदे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने लढण्याची ग्वाही आमदार व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी दिली. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडलेल्या शपथविधी समारंभात त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.

महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांसह पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एका सदस्याचा शपथविधी यावेळी पार पडला. डॉ. गोऱ्हे यांच्यासह ओमप्रकाश (बच्चू) कडू, अंबादास दानवे, प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, झीशन सिद्दिकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांनी शपथ घेतली.“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य याबद्दल आभारी आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

 “२००२ ते २०१४ या काळात विरोधी पक्षात असताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे प्रश्न सातत्याने मांडले. २०१४ नंतर सत्तेत काम करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्याच विचारांचा वारसा पुढे नेत आहोत,” असेही त्या म्हणाल्या.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, “जिथे कमी, तिथे आम्ही अशी मदतीची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही शिवसेना महिला आघाडी पुढे नेत आहोत असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “अशा प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. पीडित मुलींच्या पुनर्वसनासाठीही प्रभावीपणे काम सुरू ठेवणार आहोत.”‘लाडकी बहीण’ योजनेतील सव्वा दोन कोटी महिलांसह राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.लोकशाही मूल्यांना बळकटी देणारा आणि संसदीय परंपरेचा गौरव वाढवणारा हा शपथविधी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


 Give Feedback



 जाहिराती