पुणे : शहरातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करून महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले. पुणे महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी महसूल वाढ, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि आरोग्य सेवांवर विशेष भर दिला.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्तांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था, पुनर्विकास प्रकल्प आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर
शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी कचरा संकलन वाहनांची संख्या वाढवणे, चालकांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि ओला-सुका कचरा वर्गीकरणाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले.
आरोग्य क्षेत्रात महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमधील सुविधा उन्नत करण्यासोबतच पीपीपी तत्त्वावर नवीन हॉस्पिटल प्रकल्प राबवण्याबाबतही चर्चा झाली. नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी ‘पेट स्कॅन’सारख्या आधुनिक वैद्यकीय सुविधांचा समावेश करण्यावर महापौरांनी भर दिला.
ऑनलाइन पार्किंग आणि मल्टी-लेव्हल प्रकल्पांना गती
वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात ऑनलाइन पार्किंग प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध भागांमध्ये मल्टी-लेव्हल पार्किंग प्रकल्प उभारून नागरिकांना सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण कमी होऊन महापालिकेच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पुनर्विकास आणि पायाभूत सुविधांवर लक्ष
जुन्या इमारतींचा पुनर्विकास, नव्या इमारतींची उभारणी आणि विविध प्रकल्पांच्या खर्चाचे व्यवहार्य नियोजन करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. शहरातील रस्ते आणि काँक्रीट पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावरही विशेष भर देण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.याशिवाय पीएमसी कॉलनी विकास, भवानी पेठ आणि राजेवाडी परिसरातील प्रकल्प, बस थांब्यांचे आधुनिकीकरण आणि नागरी सुविधा उभारणीसंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आधुनिकीकरण
पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी शहरातील प्रमुख नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ग. दि. माडगूळकर सभागृह, भिडे वाडा, बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह आणि सिंहगड रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आधुनिक ऑडिओ-व्हिडिओ सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.