सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 जिल्हा

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान चा २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

डिजिटल पुणे    15-05-2026 11:13:24

बार्शी : लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी तथा पालखी सोहळा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना यावर्षीचा (२०२६) प्रतिष्ठेचा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंढरपूर व जळगाव येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने दरवर्षी पालखी सोहळ्यातील कार्य तसेच भागवत धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा संस्थेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ “भागवत धर्म प्रसारक” पुरस्काराने गौरव करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा, शाल, श्रीफळ व संत मुक्ताबाई चरित्र ग्रंथ असे आहे.यावर्षीचा पुरस्कार शहाजी फुरडे-पाटील यांना जाहीर झाल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

शहाजी फुरडे-पाटील हे गेली वीस वर्षे लोकमतचे बार्शी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथील रहिवासी असलेल्या फुरडे-पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांची वारकरी परंपरा भक्तिभावाने जपली आहे. माध्यम क्षेत्रात कार्य करताना त्यांनी मागील १८ वर्षांपासून पालखी मार्गावरील वारीचे सातत्यपूर्ण वार्तांकन करून भागवत धर्माचा विचार, प्रचार व प्रसार घरोघरी पोहोचविण्याचे कार्य केले आहे.

आषाढी वारीदरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज तसेच आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्यांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. इंदापूर ते पंढरपूर, फलटण ते पंढरपूर तसेच मुक्ताई सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वारी मार्गावरील विविध सामाजिक, धार्मिक व मूलभूत प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने लेखणी चालविली आहे. आषाढी एकादशी सोहळा, महापूजा आणि पंढरपूर शहरातील वार्तांकनही त्यांनी प्रभावीपणे केले आहे.

सन २००८ मध्ये लोकमतचे तत्कालीन संपादक सुधीर महाजन व पंढरपूर कार्यालय प्रमुख प्रताप नलावडे यांनी त्यांना वारी वार्तांकनासाठी संधी दिली. पहिल्याच वर्षी त्यांनी माऊली पालखी सोहळ्यावर विविध विषयांवर लेखन करून वेगळी ओळख निर्माण केली. वारीतील ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, विलास काटे, राजेंद्रकृष्ण कापसे, राजाभाऊ चोपदार व पुंडलिक मोरे महाराज यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

भगवंत मंदिरात श्रावण महिन्यात आयोजित जयवंत बोधले महाराजांच्या प्रवचनमालेवर “बोधवाणी” सदरातून सलग पाच वर्षे त्यांनी लेखन केले आहे. तसेच पंढरपूर ते मुक्ताईनगर जाणाऱ्या पांडुरंगराय पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासादरम्यान बार्शीतील दुपारच्या विसाव्याचे नियोजन व वारकरी सेवेतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.यापूर्वी हा पुरस्कार सूर्यकांत भिसे (पुण्यनगरी), शंकर टेमघरे (सकाळ), मनोज मांढरे (प्रेस फोटोग्राफर), राजेंद्रकृष्ण कापसे (सकाळ) आणि सुनील लांडगे (महाराष्ट्र टाइम्स) यांना प्रदान करण्यात आला आहे.

दरम्यान, “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार, वारकरी व विविध क्षेत्रांतून शहाजी फुरडे-पाटील यांचे अभिनंदन होत आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई मठात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती