पुणे : संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज भुईंज, वाई येथून सातारा-पुणे महामार्गावरील विविध कामांची पाहणी केली. विशेषत: खंबाटकी घाटातील सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पाची त्यांनी सविस्तर माहिती घेत कामाचा आढावा घेतला.
खंबाटकी घाटातील मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या. घाट परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी कामात कोणताही विलंब होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर गडकरी यांनी पुण्यातील नवले पुलाच्या कामाचीही तपासणी केली. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन पुलाच्या बांधकामातील त्रुटी, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि सातारा-पुणे महामार्गावरील कामांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.