पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला अटक केली आहे. लातूरमधील माजी रसायनशास्त्र प्राध्यापक असलेल्या कुलकर्णीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी हा राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांच्या गोपनीय प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी संबंधित होता. याच पदाचा गैरफायदा घेत त्याने केमिस्ट्री विषयाचा पेपर लीक केल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे.
लातूरमधील दयानंद महाविद्यालयात जवळपास 28 वर्षे अध्यापन केलेल्या कुलकर्णीचा मेडिकल प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शन क्षेत्रात मोठा प्रभाव होता. निवृत्तीनंतर तो पुण्यात वास्तव्यास होता आणि विद्यार्थ्यांना खासगी मार्गदर्शन करत होता.
सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल 2026 च्या अखेरीस काही विद्यार्थ्यांना गुप्तपणे प्रश्न व उत्तरे पाठ करून घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमध्ये प्रत्येक आरोपीकडे वेगवेगळ्या विषयांची जबाबदारी देण्यात आली होती. कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर लीक करत होता, तर नाशिकमधील शुभम खैरनार बायोलॉजी विषयाशी संबंधित नेटवर्क सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांना संशय येऊ नये म्हणून संपूर्ण प्रश्नपत्रिका एकाचवेळी लीक न करता विषयानुसार तुकड्यांत माहिती पुरवली जात होती. विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळवून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिचे नावही समोर आले आहे. तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत संपर्क साधून मोठ्या आर्थिक डील करण्यात आल्याचा आरोप आहे.लातूर आणि पुण्यात टाकलेल्या छाप्यांनंतर सीबीआयने या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले असून, आतापर्यंत देशभरातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 8 वर पोहोचली आहे.