बारामती / लासलगाव : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या घसरलेल्या बाजारभावामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कांद्याला मिळणारा कमी दर, अवकाळी पाऊस, गारपीट आणि सरकारच्या धोरणांविरोधात लासलगाव बाजार समितीत आज ‘शेतकरी एल्गार’ आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
आंदोलनावेळी हजारो शेतकरी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सहभागी झाले होते. काही शेतकऱ्यांनी कमरेला केळीची पाने बांधून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने भविष्यात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः कांद्याने भरलेला ट्रॅक्टर चालवत बाजार समितीत प्रवेश केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “निवडणुकीपूर्वी कांद्याला 24 रुपये दर जाहीर केला जातो आणि निवडणुकीनंतर तो 12 रुपयांवर आणला जातो. शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. उत्पादन खर्चच 18 रुपये किलोपर्यंत जात असताना शेतकरी 2 ते 3 रुपयांत माल विकण्यास मजबूर आहेत,” असे ते म्हणाले.
कांद्याला किमान 22 ते 24 रुपये प्रति किलो दर मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मागील कांदा अनुदान वितरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी नाफेडच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला.या आंदोलनात विविध भागांतून आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव द्यावा, अशी जोरदार मागणी केली.