पुणे : वडगाव बुद्रुक परिसरात नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारे जनसंवाद अभियान नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. या अभियानाचे अकरावे पुष्प सहयोग मित्र मंडळ गणेश मंदिराजवळ आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमात हायवे परिसरातील विविध गृहरचना सोसायट्यांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध नागरी समस्या मांडत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी परिसरातील वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे निर्माण होणारे अडथळे, ड्रेनेज लाईनच्या समस्या, पुणे महानगरपालिकेच्या जलतरण हॉल परिसरात काही उपद्रवी तरुणांकडून होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवेशद्वार आणि संरक्षक कंपाऊंड उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
चर्चेनंतर संबंधित ठिकाणांची नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नगरसेवक हरिभाऊ चरवड यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भविष्यातही अशा प्रकारचे जनसंवाद अभियान दर रविवारी विविध भागांमध्ये नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.