मुंबई : न्हावा – शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या समस्यांबाबत शासन गंभीर असून, मच्छीमारांचे हित अबाधित ठेवत त्यांच्या सर्व प्रश्नांवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या अडचणी, नुकसानभरपाई, पुनर्वसन, मासेमारी व्यवसायावर झालेला परिणाम तसेच भविष्यातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांकडून अहवाल सादर करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.