मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरातील रेल्वे हद्दीत उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर झोपड्यांवर आजपासून मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेकडून दोन दिवसांची विशेष मोहीम राबवली जात असून, या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ सुमारे 5 हजार चौरस मीटर जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते. या ठिकाणी तब्बल 409 पक्क्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. रेल्वेने यापूर्वी अनेक वेळा अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्याने प्रक्रिया लांबली होती.
पब्लिक प्रिमायसेस ॲक्ट 1971 अंतर्गत ही जमीन रेल्वेची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. कारवाईपूर्वीच अनेक कुटुंबांनी घरातील सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. रस्त्यांवर घरगुती वस्तू, फ्रीज, कुलर आणि अन्य साहित्याचे ढीग दिसून आले.
रेल्वे प्रशासनाने या झोपडपट्टीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि अस्वच्छता वाढत असल्याचा दावा केला आहे. तसेच ट्रॅकवर कचरा टाकल्यामुळे वारंवार आगीच्या घटनाही घडत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथकाचे जवानही परिसरात तैनात असून संपूर्ण भागाला छावणीचे स्वरूप आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही परिसराला भेट दिली.या कारवाईमुळे गरीब नगरमधील शेकडो कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली असून, पुढील दोन दिवस परिसरात तणाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.