मुंबई : गेटवे ऑफ इंडिया परिसरातील डिझेलवर चालणाऱ्या बोटी आता टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. हरित पर्यावरण आणि इंधन बचतीच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या उपक्रमासाठी बोट मालकांना मुंबई बँकेमार्फत कमी व्याजदराचे कर्ज आणि विशेष आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि मुंबई बँक अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
प्रमुख मुद्दे:
गेटवे परिसरात सध्या 97 परवानाधारक लाकडी बोटी कार्यरत
या सर्व बोटी डिझेलवर चालतात, ज्यामुळे दरमहा मोठा इंधन खर्च
इलेक्ट्रिक बोटींची किंमत अंदाजे ₹2.5 कोटी ते ₹6 कोटी
सुरुवातीला 25 लाभार्थ्यांना प्राधान्य
पहिल्या टप्प्यात 5 बोटी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध
मुंबई बँकेकडून स्वतंत्र कर्ज व धोरण तयार करण्याचे निर्देश
सरकारच्या या उपक्रमामुळे कोळी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञान मिळणार असून इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच मुंबईतील जलपर्यटन अधिक पर्यावरणपूरक होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.