उरण : महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळण्यासाठीची प्रकरणे सावंतवाडी नगरपरिषद, उरण नगरपरिषद आणि काही तुरळक ठिकाणी केवळ त्या त्या ठिकाणच्या मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रलंबित आहेत.या गंभीर विषयाच्या अनुषंगाने उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची माजी राज्यमंत्री प्रविण भोसले आणि कामगार नेते संतोष पवार, कार्याध्यक्ष म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन यांनी एक्स्प्रेस टॉवर येथे भेट घेतली.
सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय, मा. उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, तसेच नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे स्पष्ट आदेश असतानाही विनाकारण दिरंगाई होत असल्याचे शिष्टमंडळाने मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
याची तात्काळ दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय अभिषेक कृष्णा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. यावेळी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, _"संबंधित अधिकारी विनाकारण अडवणूक करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर ३१ मे २०२६ नंतर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल."
या बैठकीस सावंतवाडी नगरपरिषदेचे सफाई कामगारांचे वारस गोपाळ नामदेव सावंत, सुनिल नारायण परब, नितीन सदानंद कदम आणि संदीप पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी आपली व्यथा मंत्रीमहोदयांसमोर मांडली.
शासनाचे स्पष्ट आदेश असूनही मुख्याधिकारी पातळीवर फाईल अडवून ठेवली जात असल्याने अनेक सफाई कामगार कुटुंबे न्यायापासून वंचित आहेत. आयुक्तांच्या आश्वासनामुळे आता कारवाईची अपेक्षा वाढली आहे.